नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहत्सुक शहरातील एका व्यावसायीकास तब्बल सहा लाख रूपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. विवाहत्सुक व्यावसायीकाने एका संकेत स्थळावर संपर्क साधल्याने हा प्रकार घडला. संभाव्य वधूशी ऑनलाईन बोलणे करून देण्याचे आमिष दाखवत ही फसवणूक करण्यात आली आहे. अभिजीत पाटील (३० रा.गंगापूररोड) असे फसवणुक झालेल्या व्यावसायीकाचे नाव आहे.
याबाबत घटलेली घटना अशी की, पाटील यांनी ऑनलाईन असलेल्या विवाह जुळविणा-या संकेत स्थळांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी फ्री रजिस्टेशन असलेल्या मॅट्रोमोनियल संकेत स्थळावर नाव नोंदणी केली. त्यानंतर एप्रिल महिन्यात एका अनोळखी महिलेने त्यांच्याशी संपर्क साधत आपण ऑनलाईन वधू वर सुचक मंडळाची प्रतिनिधी असल्याचे सांगून ही फसवणुक केली. याच काळात संकेतस्थळाच्या माध्यमातून झुम मिटींगद्वारे ऑनलाईन वधू वर सुचक मेळावा भरविण्यात आला. या मेळाव्यातील एक तरूणी पाटील यांच्या पसंतीस उतरली. तरूणीनेही पाटील यांना होकार दिला. त्यामुळे पाटील बोहल्यावर चढण्याची स्वप्न बघत असतांनांच संकेत स्थळावरून अनोळखी महिला प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला.
पसंतीचा कार्यक्रम उरकला असेल तर पुढील बोलणी करण्यासाठी तिने पैशांची मागणी केली. त्यामुळे पाटील मागणीनुसार तिला पैसे देत गेले. विविध बँक खाते आणि युपीआय आयडीच्या माध्यमातून तब्बल ६ लाख १० हजार रूपयांच्या रकमा पाटील यांच्याकडून उकळण्यात आल्या. पसंतीस उतरलेल्या वधूशी लग्न जमविण्यासाठी कॉन्फन्स कॉल अथवा झुम मिटींगद्वारे बोलणे करण्यासाठी सदर महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ती नॉटरिचेबल झाल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला.
पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष पवार करीत आहेत.