नाशिक : स्विफ्ट कारसह वेगवेगळया भागातून दोन मोटारसायकली चोरट्यांनी शहरातून चोरून नेल्या. याप्रकरणी उपनगर,पंचवटी व इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपळगाव खांब येथील प्रकाश सुरेश जाधव यांची स्विफ्ट कार एमएच १५ इएक्स २७९२ रविवारी (दि.२४) रात्री वडनेर पाथर्डी रोडवरील पिंपळगाव फाटा येथे राहणारे त्यांच्या काकांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत. दुसरी घटना हिरावाडीत घडली. रामशंकर शिवराज वर्मा (रा.रविअमृत सोसा.अभिजीतनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वर्मा यांची स्कुटर एमएच १५ एचडी ६१२३ गेल्या शनिवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास त्याच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वनवे करीत आहेत. तर महेंद्र नामदेव सपकाळे (रा.अमळनेर जि.जळगाव) हे गेल्या गुरूवारी (दि.२१) शहरात आले होते. रात्रीच्या सुमारास आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी ते पाथर्डी फाटा येथील वक्रतुंण्ड हॉस्पिटल येथे गेले असता ही घटना घडली. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १९ एयू ९८५९ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पथवे करीत आहेत.