नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २५ हून अधिक घरफोड्या करणा-या सराईत चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. कारागृहातून सुटताच त्याने घरफोड्या केल्या. त्याच्या अटकेने अकरा गुन्हे उघडकीस आले आहे. या घटनेत चोरीचे सोने – चांदी खरेदी करणा-या सराफासही पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल १२ लाख १८ हजार रूपये किमतीचे अलंकार जप्त करण्यात आले आहेत.
ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. शंकर शामराव कापसे व तुषार चंद्रकांत शहाणे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून शहाणे हा सराफ व्यावसायीक आहे.
पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात या चोराने पंचवटी, म्हसरूळ, आडगाव, इंदिरानगर, नाशिकरोड व मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत अवघ्या काही दिवसात साथीदाराच्या मदतीने अकरा घरफोड्या केल्या असून चोरीचा माल तुषार शहाणे यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी शहाणे यास ताब्यात घेतले असता त्याने चोरीचा ऐवज विकत घेतल्याचे कबुल केले. संशयिताच्या ताब्यातून सुमारे १८० ग्रॅम वजनाचे सोने व दोन किलो वजनाची चांदी असा सुमारे १२ लाख १८ हजार रूपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.
दोघा संशयितांना न्यायालयाने मंगळवार (दि.२५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित कापसे अट्टल चोरटा असून त्याने २५ हून अधिक घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. तर सराफ व्यावसायीक शहाणे याच्यावर यापूर्वीही चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.
सापळा लावून चोरास घेतले ताब्यात
शहर गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक चोरट्यांच्या मागावर असतांनाच जमादार रविंद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सराईत कापसे हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर पडला असून त्याने अनेक घरफोड्या केल्या आहेत. तसेच तो मालधक्का रोडवरील गुलाबवाडी भागात येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले असता त्याने प्रथम आडगाव पोलिस ठाणे हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे व युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखील सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक विष्णू उगले,चेतन श्रीवंत,जमादार रविंद्र बागुल,हवालदार प्रविण वाघमारे,नाझीम पठाण,शरद सोनवणे,संदिप भांड पोलिस नाईक प्रशांत मरकड,महेश साळुंखे,विशाल काठे,विशाल देवरे,राहूल पालखेडे व चालका आण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.