नाशिक – राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने साडे चौदा लाख रूपये किमतीचा बेकायदा गुटख्यासह कार जप्त केली आहे. याप्रकरणी नाशिक तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक भुषण प्रताप वानखेडे (२८) याला गजाआड करण्यात आले आहे. रविवारी गिरणारे रोडवरील जी.पी.फार्म भागात एक्साईज विभाग आणि एफडीएचे पथकाने संयुक्त नाकाबंदी केल्यानंतर हा गुटखा हाती लागला आहे. या संयुक्त पथकांने एमएच १५ एफव्ही २५४६ या चारचाकीची तपासणी केली असता त्यात १३ लाख ६ हजार ८०० रूपये किमतीचे विमल आणि १ लाख ४५ हजार २०० रूपये किमतीची सुगंधी तंबाखू आढळून आला. पथकाने पाच लाख रूपये किमतीच्या वाहनासह गुटख्याचा साठा जप्त केला आहे. हा साठा कोणाच्या मालकीचा व कोठे वाहतूक केला जात होता याबाबत चालकाकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सह आयुक्त (अन्न) गणेश परळीकर,एक्साईजचे अधिक्षक शशिकांत गर्जे, सहाय्यक आयुक्त विवेक पाटील,अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे, के.री.पाळे तसेच एक्साईज विभागाच्या भरारी पथक क्र.१ ने केली.