नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. याप्रकरणी मुंबईनाका आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला अपघात गोविंदनगर भागात झाला. हिरामण केशव जाधव (५२ रा.सुनंदा हाईटस,त्रिकोणी गार्डन जवळ ) हे सोमवारी (दि.२९) रात्री गोविंदनगर येथील प्रकाश पेट्रोल पंप आवारातून पायी जात असतांना भरधाव आलेल्या एमएच १५ जीव्ही ८८२४ या रूग्णवाहिकेने त्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस नाईक सुनिल बहिरम यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात अॅम्ब्युलन्स चालक रूपेश सुरेश पाटील (२४ रा.शिवाजीनगर,सातपूर) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
दुसरा अपघात व्दारका परिसरात झाला. संतोष रामदास गादेकर (४०) व विजय केसरी यादव (६२ रा.दोघे ओझर ता.निफाड) हे दोघे गेल्या मंगळवारी (दि.२३) रात्री नाशिककडून ओझरच्या दिशेने दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. द्वारका परिसरात भरधाव चारचाकीने दुचाकीस पाठीमागून धडक दिली.
या अपघातात मोटारसायकलवरील दोघे जखमी झाले होते तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. त्यातील दुचाकीचालक संतोष गादेकर यांचा मृत्यू झाला असून जखमी यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत हवालदार सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चारचाकी चालकाविरूध्द भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोडे करीत आहेत.
धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
लहवित ते अस्वली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. सुबोध हरिष पै (रा.महात्मानगर,नाशिक) असे रेल्वे अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत लहवित रेल्वेस्टेशनचे मास्तर सुभाष टोंगारे यांनी खबर दिली आहे.
सुबोध पै हा मुलगा मंगळवारी (दि.३०) दुपारी गरीबरथ एक्सप्रेसने नं. २१८७ नाशिकरोड कडून मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. लहवित ते अस्वली दरम्यानच्या पोल नं. १६८ – २६२८ चे जवळ रेल्वे अपघात होवून धावत्या रेल्वेतून पडल्याने मयत अवस्थेत मिळून आला. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.