नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने सिबीएस येथे बसमधून उतरत असतांना गर्दीची संधी साधत भामट्याने प्रवाश्याच्या खिशातील पाकिट हातोहात लांबविल्याची घटना घडली. या पाकिटात युएई चलनासह ११ हजार रूपयांची रोकड व महत्वाचे कागदपत्र होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
चेतनराम गोकुळ शेवाळे (रा.पार्क साईट रेसिडेन्सी इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शेवाळे मंगळवारी (दि.९) बाहेरगावी गेले होते. सायंकाळच्या सुमारास ते परतले असता ही घटना घडली. जुने सिबीएस बसस्थानकात ते एसटीच्या खाली उतरत असतांना गर्दीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅण्टच्या खिशातील पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात ११ हजाराची रोकड युएई चलन,डेबिट आणि क्रेडिट कार्ड तसेच महत्वाचे कागदपत्र होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
महिलेच्या गळ्य़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले
मखलमलाबाद रोडवरील स्वामी जनार्दन नगर भागात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ६६ वर्षीय महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी चंद्रभागा जगन्नाथ तळेकर (रा.मातोश्री निवास स्वामी जनार्दन नगर) यांनी तक्रार दाखल केली असू पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेकर या मंगळवारी (दि.९) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. घराजवळील कॉलनी रोड भागात त्या फेरफटका मारत असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.