नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एम फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉईन ५५ च्या नावाने शहरातील २३ जणांना साडे चार कोटीला गंडा घातल्याचे समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसणणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विविध प्रलोभणे दाखवून सहा महिन्यात दामदुप्पट अश्या योजनेच्या माध्यमातून ही फसवणुक झाल्याचे बोलले जात आहे.
याप्रकरणी युवराज रूस्तम गायकवाड उर्फ युवराज पाटील (रा.पवननगर,सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद हबीब मोहम्मद हनीफ (रा.गुलबर्गा कर्नाटक) आणि मोहम्मद अब्बास मोहम्मद युसूफ अशी गंडा घालणा-या संशयिताची नावे आहेत. संशयितांनी तक्रारदार आणि त्याच्या मित्रांचा विश्वास संपादन केला. त्र्यंबक रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जानेवारी २०२१ मध्ये बैठक घेतली. नागरिकांना गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. सहा महिन्यात गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. गुंतवणूकदारांना वेगवेगळे पारितोषिक मिळतील.
इतकेच नव्हे तर, अलिशान मोटार व विदेशात यात्रेची संधी असल्याच्या भूलथापा दिल्या गेल्या. त्यास अनेक जण भुलले. कोणी पाच लाख तर, कोणी १० ते २० लाखांपर्यंतची रक्कम या योजनांमध्ये गुंतवली. संशयितांचे एम फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीच्या नावाने वेबपोर्टल होते. त्यावर गुंतवणूक व तत्सम माहिती दिली जात असल्याचे सांगितले जाते.
याच काळात संशयितांनी कॉर्बेट क्रिप्टो कॉईन ५५ आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी अॅपही विकसित केले. एम फॉरेक्स व कॉर्बेट क्रिप्टो कॉईनच्या नावाने गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांमधून आणि रोख स्वरुपात चार कोटी १८ हजारहून अधिक रक्कम घेण्यात आली. मुदत संपुष्टात आल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही.
संशयितांचा सपर्क तुटल्याने तसेच वेब पोर्टल आणि आर्थिक व्यवहाराचे अॅपही बंद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एम. पिसे हे करीत आहेत. या प्रकरणात अन्य कुणाची फसवणूक झालेली असल्यास नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पिसे यांनी केले आहे.