नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील शालिमार वायर कंपनी परिसरात भरधाव कार इलेक्ट्रीकच्या लोखंडी पोलावर जावून आदळल्याने ८१ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. जगन्नाथ वासूदेव शर्मा (रा. गुलमोहर विहार कॉलनी, सातपूर) असे मृत कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मा गेल्या २ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास सेंट्रो कार एमएच १५ डीएन ६६७३ घेवून औद्योगीक वसाहतीतील एस.एस. इंजिनिअरींग या आपल्या कंपनीच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. शालिमार वायर कंपनीसमोरून ते प्रवास करीत असतांना भरधाव कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलवर जावून आदळली.
या अपघातात शर्मा गंभीर जखमी झाले होते. मुलगी गीता शर्मा यांनी त्यांना तातडीने श्रीगुरूजी हॉस्पिटल येथे दाखल केले असता महिनाभराच्या उपचारानंतर शुक्रवारी (दि.५) डॉ.विक्रम सैनी यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सय्यद करीत आहेत.