नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी १ लाख ७ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना पेठफाटा परिसरात घडली. या घरफोडीत सोन्याचांदीच्या मुर्त्यांसह पुजेचे साहित्य आणि घड्याळ चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी भगवतीबेन बाबुभाई पटेल (रा.श्री अंबिका सोसा.श्रीराम मिल शेजारी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पटेल कुटुंबिय २६ एप्रिल ते ३ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून देवघरातील सोन्याचांदीच्या मुर्त्या आणि देव पुजेचे साहित्य तसेच दोन मनगटी घड्याळे असा सुमारे १ लाख ७ हजार ३०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
जुने सीबीएसला मोबाईल लांबवला
जुने सिबीएस बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत प्रवाश्याच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी हातोहात लंपास केला. याप्रकरणी सिन्नर तालुक्यातील निमगाव येथील ऋषीकेश नागरे (३८) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरे बुधवारी (दि.३) शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी ते सीबीएस बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.बसस्थानक आवारात वावरणा-या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाश्यांमधून होत आहे.