नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील बोधले नाका भागात कट मारल्याच्या रागातून अॅटोरिक्षा चालकाने बसची काच फोडल्याची घटना घडली. या घटनेत बसचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्हयातील मिरज येथील सागर नारायण रूपनर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रूपनगर एस.टी महामंडळात चालक पदावर कार्यरत असून ते मंगळवारी (दि.२) पुणा नाशिक या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. रूपनर हे पुणेरोडने प्रवासी बस घेवून शहरात दाखल होत होते. त्याचवेळी बोधले नगर येथील पेट्रोल पंप परिसरात डाव्या बाजूने आलेल्या एमएच १५ एफयू ९०४० वरील चालकाने कट मारल्याच्या कारणातून धावत्या बसवर दगड फेकून मारला. या घटनेत बसची समोरील काच फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असून अधिक तपास पोलिस नाईक ठिंगळे करीत आहेत.