नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विहीतगाव वडनेर रोडवरील मराठी शाळा परिसरात भरधाव मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत रिक्षाचालक ठार झाला. लक्ष्मण ज्ञानेश्वर पाचारणे (४७ रा. कडवे नगर, पाथर्डी शिवार) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून टेम्पो चालकास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचारणे बुधवारी नाशिकरोड येथून वडनेररोडने पाथर्डीच्या दिशेने आपल्या अॅटोरिक्षा एमएच १५ एके ५२१२ तून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. वडनेररोडवरील विहीतगाव मराठी शाळे समोरून ते जात असतांना रॉंगसाईडने आलेल्या छोटा हत्ती टेम्पोने रिक्षास जोरदार धडक दिली.
या अपघातात पाचारणे गंभीर जखमी झाल्याने मित्र सागर कडभाने यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले. याप्रकरणी रमेश बहोत यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून टेम्पोचालक किरण शांताराम साळुंके (२८ रा.संगमनेर जि.अ.नगर) यास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.