नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुरलीधर सोमनाथ पवार (रा. सती आसरा कॉलनी, पाझर तलावा जवळ, शिवाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या आठवडाभर पवार यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवार गेल्या २७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास शेजारी सुमा अमोल गोतीश यांच्या स्वयंपाक घरात गप्पा मारत बसलेले असतांना ही घटना घडली. अचानक गॅसचा भडका उडाल्याने पवार गंभीर भाजले होते. बहिण बायडी बोर्डे यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता बुधवारी (दि.३) उपचार सुरू असतांना डॉ.आदित्य कोंडापल्ली यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
१८ वर्षीय युवतीची आत्महत्या
१८ वर्षीय युवतीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जुने नाशिक परिसरातील डिंगरअळी भागात घडली. गायत्री विनायक देसले (रा.राजगुरू वाडा, संभाजी चौक) असे मृत तरूणीचे नाव आहे. गायत्रीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गायत्री देसले या युवतीने बुधवारी (दि.३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णायात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले.