नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रोकडोबावाडी भागात क्रिकेट खेळतांना आमच्याकडे रागाने का पाहिले या कारणातून तीन जणांनी तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी पाईपाचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला आहे. विजय बागूल, वितश बागुल, पवन बागुल (रा. सर्व रोकडोबावाडी, देवळाली गाव) अशी युवकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी विकास राजू साळवे (२३ रा. मते किराणा पाठीमागे, रोकडोबावाडी) या युवकाने तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात त्रिकुटाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साळवे मंगळवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास घर परिसरातील मते किराणा दुकानासमोरील रोडवर क्रिकेट खेळत असतांना ही घटना घडली. संशयित त्रिकुटाने त्यास गाठून तू आमच्याकडे रागाने का पाहिले असा जाब विचारत लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या घटनेत साळवे जखमी झाला असून अधिक तपास जमादार कोकाटे करीत आहेत.