नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरणपूररोडवरील मिशन मळा भागात पोलिसात तक्रार केल्याच्या कारणातून एकाने दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. निलेश खंडीजोड (वय ३०) असे दुचाकी पेटविणा-या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी अंजली विजय गुळवे (रा.मिशनमळा, शरणपूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुळवे यांनी संशयिताविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या कारणातून संतप्त संशयिताने हे कृत्य केले. बुधवारी (दि.३) गुळवे यांच्या मुलीची दुचाकी घरासमोर लावलेली असतांना संशयिताने ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून या घटनेत दुचाकी जळून खाक झाली आहे. अधिक तपास पोलिस नाईक गांगुर्डे करीत आहेत.
बंद असलेल्या कारखान्यातील १ लाख ७० हजाराचे साहित्य चोरट्यांनी केले लंपास
अंबड औद्योगिक वसाहतीत वॉल कंपाऊडच्या भिंतीवरून उडी मारून बंद असलेल्या कारखान्यातील साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या घटनेत १ लाख ७० हजार रूपये किमतीची एनडब्ल्यू फिक्स कॉन्टेट चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज विजय दंडगव्हाळ (रा.राणाप्रताप चौक, सिडको) यांनी तक्रार दाखल केली आहे. दंडगव्हाळ यांचे औद्योगिक वसाहतीत वैष्णवी अॅटो प्रा.लि.नावाची कंपनी आहे. गेल्या १५ ते १८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. चार दिवस कंपनी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी वॉल कंपाऊडच्या भितीवरून उडी मारून कारखान्यात प्रवेश केला. यावेळी आवारातील सुमारे १ लाख ७० हजार रूपये किमतीची एनडब्ल्यू फिक्स कॉन्टेट चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.