नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तिडके कॉलनीत प्रेमप्रकरणाच्या संशयातून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. या हल्लेखोरास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. दिपक बिपीन सिंग (३२ रा.दत्तनगर, चुंचाळे शिवार, अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याप्रकरणी अमोल भाऊसाहेब शिंदे (३३ रा.गणेश चौक, कामगारनगर सातपूर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे सोमवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास तिडके कॉलनीतील साई स्केअर बिल्डींगच्या जिन्यातून जात असतांना हा हल्ला झाला.
पाचव्या मजल्याच्या दिशेने जिन्यातून तो जात असतांना जिन्यात दबा धरून बसलेल्या संशयिताने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत शिंदे गंभीर जखमी झाला असून हा हल्ला प्रेमप्रकरणाच्या संशयातून झाल्याचे बोलले जात आहे. जखमीच्या जबाबावरून संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.









