नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अचानक ब्रेक लावल्याच्या वादातून वडाळा नाका भागात बस अडवून चालकास दोघा दुचाकीस्वारांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रल्हादसिंह नारूभा गोहिल (रा. केरिया भावनगर, गुजरात) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोहिल हे गुजरात राज्यातील भावनगर बस आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. गुजरात महामंडळाच्या भावनगर ते नाशिक या बसवर ते सेवा बजावत होते. ही बस नाशिकला आली असतानाच ही घटना घडली आहे.
नाशिक येथून प्रवासी भरून ते परतीच्या प्रवासास लागले होते. ही बस वडाळानाका भागातील उड्डाणपूलाखाली (एमएच १५ जीयू ६२२४) आली. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी धावती बस अडवली. अचानक ब्रेक का लावला असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. संशयितांनी चालक कॅबीनमध्ये चढून चालक गोहिल यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652636133145317377?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1652610529440206849?s=20