नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने अनेक कुटुंब आपल्या मुलांना घेऊन गावाकडे गेले आहेत. त्यामुळे अनेक घरे बंद आहेत. आणि याच घरांची रेकी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे, धुळ्यातील चोरांची टोळी नाशकात घरफोडी करीत होती. नाशिक पोलिसांच्या धाडसी कारवाई हे सर्व उजेडात आले आहे.
शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या एका टोळीला नाशिक पोलिसांनी धुळे येथून सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडून २१ लाखांचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि परिसरात घरफोडीच्या घटनांत वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत असताना, धुळे येथील एक टोळी शहरात घरफोडी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. शहरातील पंचवटी येथील एक रिक्षाचालक बंद घरांची रेकी करून ती माहिती धुळे येथील मित्रांना देत होता.
अंबड पोलिसांनी त्याची चौकशी केली असता पोलिसांनी धुळे येथून काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. या टोळीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले. या टोळीकडून सोने, चांदी, कार, मोबाईल, टी.व्ही. असा एकूण २० लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.