नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियाचा शहरातील तरुणाईवर मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. सोशल मिडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोशल मिडियात पोस्ट टाकल्याच्या रागातून दोन दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या करण्यात आली. त्यानंतर आता दोन जणांनी एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
नांदूरनाका भागात सोशल मीडियावर आमच्या विरोधात पोस्ट करतो का असे म्हणत दोघांनी एका १७ वर्षीय तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बंटी जगताप व बबलू जगताप अशी तरुणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश राकेश सोनवणे (१७ रा.जनार्दननगर,नांदूरनाका) यांनी तक्रार दाखल केली असून आडगाव पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस दुकलीचा शोध घेत आहेत.
आकाश सोनवणे गुरूवारी (दि.२७) सायंकाळच्या सुमारास नांदूरनाक्याकडून आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. संशयित दोघांनी त्याची वाट अडवत तू आमच्या विरोधात इस्टाग्रामवर पोस्ट का केली याबाबत जाब विचारत त्यास शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या वेळी संशयितांनी पोलिसात तक्रार केली तर पुन्हा मारू असा दम भरला. या घटनेत काही तरी वजनी वस्तू मारण्यात आल्याने सोनवणे जखमी झाला असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651890010751393793?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651889945622241280?s=20