नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सातपूर या कामगार वस्तीत आत्महत्येचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी एकाच कुटुंबातील तिघांनी सावकारी जाचाला कंटाळून जीवन संपविले. त्यानंतर दररोज किमान एक आत्महत्येची घटना सातपूर परिसरात होत आहे. त्यातच आता गुरुवारी दिवसभरात दोन जणांनी स्वतःचे जीवन संपविल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पहिली घटना श्रमिकनगर भागात घडली. साहेबराव दगा माळी (४५ रा.हिंदी शाळेजवळ) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजी बच्छाव यांनी खबर दिली आहे.
दुसरी घटना प्रबुध्द नगर भागात घडली. येथे राहणा-या तुषार मुकूंद शिंदे (४० रा.क्रांती चौक) यांनी गुरूवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला उपरणे बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत संदिप शिंदे यांनी दिलेल्या खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार आहेर व पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.