नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करुन पसार झालेला संशयित सापडला आहे. या आरोपीला अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. योगेश रघूनाथ मराठे (२८ रा.कारगिल चौक,दत्तनगर,चुंचाळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मयुर रामदास गांगुर्डे याच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयिताचाही समावेश असल्याचे समोर आले होते. मात्र संशयित घटनेपासून पसार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत असतांना खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार स्वप्निल जुंद्रे आणि चारूदत्त निकम यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
संशयित पाथर्डी फाटा येथील शिवाजी पुतळा भागात येणार असल्याच्या माहितीवरून पथकाने सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळय़ात अडकला. त्याला अंबड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक प्रविण सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिलीप सांगळे, हवालदार किशोर रोकडे, पोलिस नाईक दत्तत्रेय चकोर, योगेश चव्हाण, अंमलदार स्वप्निल जुंद्रे, विठ्ठल चव्हाण, भगवान जाधव, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप व सविता कदम आदींच्या पथकाने केली.