नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघींवर बलात्कार तर एकीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयितामध्ये शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुखाचा समावेश असल्याचे कळते. याप्रकरणी म्हसरूळ आणि गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना महात्मानगर भागात घडली. विद्यार्थी सेनेचा जिल्हाप्रमुख असलेल्या संशयित किरण बाळासाहेब फडोळ (३३ रा.मुंगसरा ता.जि.नाशिक) याने व्यवसायासाठी पीडितेची जागा भाडेतत्वावर घेतली होती. १५ मार्च रोजी थकित भाड्याची रक्कम देत असल्याचे सांगून त्याने महिलेस महात्मानगर येथील एका हॉटेलवर बोलावून घेत बलात्कार केला. कॉफीमधून गुंगीचे औषध देत संशयिताने हे कृत्य केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. तसेच, पतीस सोडून देत माझ्या बरोबर रहा, अशी इच्छा त्याने पीडितेकडे व्यक्त केली. त्यामुळे पीडितेने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
मतीमंद मुलीवर बलात्कार
दुसरी घटना पेठरोड वरील म्हसोबावाडीत घडली. येथे राहणा-या मतीमंद पीडितेवर राजू चारोस्कर (५० रा.म्हसोबावाडी) या संशयिताने वेळोवेळी बलात्कार केला. पीडित मुलीचे कुटुंबिय कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधून संशयित मुलीच्या अज्ञान आणि मतीमंदपणाचा फायदा उचलत गेल्या आठ महिन्यांपासून हे कृत्य करीत होता. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून पोलिस पसार झालेल्या संशयिताचा शोध घेत आहेत.
महिलेचा विनयभंग
तिसरी घटना निलम स्विट भागात घडली. सतिष उर्फ पिंटू भिकुनाथ गुप्ता (३८ रा.शिवशक्ती अपा.कर्णनगर) या संशयिताने निलम स्विटस जवळ राहणा-या पीडितेच्या घरी जावून बेकायदा पैशांची मागणी केली. महिलेने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयिताने पीडितेस शिवीगाळ व दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अनुक्रमे सहाय्यक निरीक्षक आहिरे व हवालदार पांडव करीत आहेत.