नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फायनान्स कंपनीत रिकव्हरी अधिकाऱ्यांनीच अपहार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. साडे सोळा लाख रुपयांची वसूलीची रक्कम कंपनीस न भरता या दोघा कर्मचाऱ्यांनी परस्पर अपहार केला. या प्रकरणी व्यवस्थापकाने पैश्यासाठी तगादा लावला. मात्र, संशयितांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज दिलीप पवार (रा.सामनगावरोड) व दीपक सुरेश बागुल (रा.अरिंगळे मळा,एकलहरारोड) अशी लाखोंच्या रकमेचा अपहार करणा-या संशयित रिकव्हरी अधिका-यांची नावे आहेत. या प्रकरणी अरूण उत्तम पाळदे (रा.शरणपूररोड ) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार टिळकवाडी येथील आय.के.एफ फायनान्स कंपनीत कार्यरत असून तक्रारदार हे व्यवस्थापक तर संशयित रिकव्हरी अधिकारी आहेत.
संशयितांनी मे २०२० ते फेब्रुवारी २०२३ या सेवाकाळात तब्बल १६ लाख ५७ हजार रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जदारांकडून नियमीत वसूली करून संशयितांनी भरणा न करताच पैशांचा अपहार केला आहे. याबाबत व्यवस्थापक पाळदे यांनी कारवाई टाळण्यासाठी पैशांचा भरणा करण्याचा आग्रह धरला असता संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत दुस-या व्यक्तीच्या गाडी खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिल्याने पाळदे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.