नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरणपूर भागात घरगुती वापरासाठी आकडा टाकून वीज चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या वीजचोरी प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे वीज जोडणी करून ही विज चोरी करण्यात येत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरिता रविंद्र कटरे (४० रा.शरणपूर गावठाण) असे वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वीज कंपनीचे सुजित देशमुख (रा.गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांचे पथक गेल्या मंगळवारी (दि.११) वीज मिटर तपासणीसाठी शरणपूर गावठाण भागात गेले असता चोरीचा हा प्रकार समोर आला आहे.
संशयित महिलेने फिडर पोलवर बेकायदा दोन काळया रंगाची वायर टाकून ही चोरी केली. सुमारे तीस फुट अंतराची वायरने आकडा टाकून घरगुती वापरासाठी जोडणी केल्याचे समोर आले आहे. संशयित महिलेने गेल्या काही दिवसात ५१२ युनिट वीजेची चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे एमएसईबी कंपनीचे सुमारे ११ हजार ६४० रूपयांचे नुकसान झाले आहे.