नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे – नाशिक प्रवासात महामार्गावर वॉशरूमसाठी महिला व तिचे कुटुंबिय कारमधून खाली उतरले असता ९० हजार २०० रूपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या चोरीप्रकरणी पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील अर्चना देवरे यांनी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरे या शुक्रवारी (दि.२१) ठाणे येथून आपल्या कुटुंबियांसमवेत खासगी कारने नाशकात आल्या होत्या. ठाणे-नाशिक प्रवासात त्या महामार्गावरील इगतपुरी परिसरात थांबल्या असता ही घटना घडली. महामार्गावरील सार्वजनिक शौचालयाजवळ कुटूंबिय वॉशरूमसाठी कारखाली उतरले.
त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी कारमधील सिटवर पडलेली पर्स उघडून रोकड व दागिणे असा सुमारे ९० हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. स्विफ्ट कारचालकानेच ही चोरी केल्याचा संशय तक्रारीत करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शेवरे करीत आहेत.