नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदेगावातील चिंचोली फाटा भागात स्टोअररूम फोडून चोरट्यांनी रोकडसह किराणामाल असा ७४ हजाराचा ऐवज चोरून नेला. घरफोडीची ही घटना सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाली आहे. एका अनोळखी महिलेसह पुरूषाने ही चोरी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मल्हारी रामचंद्र काकड (रा.चिंचोली फाटा,शिंदेगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काकड यांचे चिंचोली फाटा परिसरात हॉटेल आणि लॉन्सचा व्यवसाय आहे. याच ठिकाणी किराणा मालासह अन्य सामान ठेवण्यासाठी स्टोअररूम आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (दि. २२) रात्री स्टोअररूमचे कुलूप तोडून ही घरफोडी केली. स्टोअररूममधील कपाटात ठेवलेली रोकड आणि किराणा माल असा सुमारे ७३ हजार ९५० रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
चोरीचा हा प्रकार परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाला असून त्यात अनोळखी महिलेसह एका पुरूषाने ही चोरी केल्याचे समोर आले आहे. संशयितांचा पोलिस शोध घेत असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.