नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रफुल्ल सोमनाथ गंगावणे (२१ रा. राजीवगांधीनगर, गोवर्धन, गंगापूरगाव) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत आहे. संशयिताने ओळखीतून मुलीस लग्नाचे आमिष दाखवत हे कृत्य केले. नोव्हेंबर २०२२ मध्ये संशयिताने मुलीचे घर गाठून एकटी असल्याची संधी साधत तिच्यावर दमदाटी करीत बलात्कार केला.
यानंतरही त्याने वेळोवेळी आपल्या घरी घेवून जात मुलीवर बलात्कार केला. मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने कुटुंबियाने संशयितास जाब विचारला असता त्याने पोलिसात तक्रार दिली तर तुम्हाला येथे राहू देणार नाही अशी धमकी दिल्याने मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे करीत आहेत.