नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात सराफी शोरूममध्ये खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी काऊंटरमधील दागिने चोरुन नेल्याचा प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस भामट्या बंटी बबलीचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली घाडगे (रा.त्रिमुर्तीनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घाडगे जेलरोड येथील चरनदास अपार्टमेंटमध्ये असलेल्या न्यू आर.एम. ज्वेलर्स या शोरूममध्ये काम पाहतात. गेल्या शनिवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घाडगे यांच्यासह शोरूममधील कर्मचारी सेवा बजावत असतांना अनोळखी महिलेसह एक पुरूष खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला होता.
संशयित काऊंटरवरील दागिण्यांची पाहणी करीत असतांना कर्मचा-यांचे लक्ष नसल्याची संधी साधत भामट्यांनी मंगळसूत्र असलेल्या सोन्याच्या सुमारे ५५ हजार रूपये किमतीच्या वाट्यांचा सेट चोरून नेला. ही घटना शोरूममधील सीसीटिव्हीत कैद झाली असून नियमीत पाहणीत ही बाब निदर्शनास आली आहे. अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.