नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फारकत तडजोडीपोटी २५ लाखाची मागणी करुन सासरच्या मंडळीने शेती आणि घर विक्री करण्यास भाग पाडू असा दम भरल्याने एकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात पत्नी, सासूसह अन्य एकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता योगेश बोराडे उर्फ सुजाता देविदास वाळुंज (२९),सत्यभामा देविदास वाळुंज (४८ रा.दोघे बनकर मळा, सिन्नरफाटा) व गणेश कोठुळे (३२ रा.खर्जुलमळा ता.जि.नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विठाबाई पांडूरंग बोराडे (रा.लहवित ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे.
बोराडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलगा योगेश पांडूरंग बोराडे (३६ रा.बाजगिरा,काळे वस्ती लहवित ता.जि.नाशिक) यांने गेल्या रविवारी (दि.१६) रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सून सुजाता आणि मुलगा योगेश यांच्यात फारकतीसाठी न्यायालयात दावा सुरू होता.
संशयितांकडून २५ लाख रूपयांची तडजोड रक्कम द्यावी अशी मागणी होत होती. मागणी पूर्ण न करणा-या योगेशला संशयितांनी शेत जमिन आणि घर विकण्यास भाग पाडू अशी धमकी देत त्रास दिल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गिते करीत आहेत.