नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात नाशिकरोड येथील मुक्तीधाम भागात झाला. प्रल्हाद खरात (७५ रा.चिखली जि.बुलढाणा) हे वृध्द शनिवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास मुक्तीधाम येथे देवदर्शन घेवून मंदिराबाहेर पडले असता त्यांना देवळाली कॅम्प कडून बिटको चौकाकडे भरधाव जाणा-या अज्ञात दुचाकीने धडक दिली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.
दुसरा अपघात महामार्गाच्या उड्डाणपूलावर झाला. या अपघातात चेतन विजय बोराळे (२० रा.गुरूरत्न सोसा.माऊली कॉलनी,भगवंत चौक,शिवाजीनगर जेलरोड) या युवकाचा दुचाकी घसरल्याने मृत्यू झाला. चेतन हा तरूण रविवारी (दि.२३) महामार्गाच्या उड्डाणपूलावरून दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. विल्होळीच्या दिशेने तो प्रवास करीत असतांना स्काय क्लार्क हॉटेलसमोर भरधाव दुचाकी घसरली. या अपघातात त्याच्या पोटास गंभीर दुखापत झाली होती.
मित्र आदित्य पगारे याने त्यास तात्काळ लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यास वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत डॉ.विक्रांत गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.