नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका परिसरात बस अडवून दोघांनी वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बसस्टॉप सोडून पत्नीस मागे उतरविल्यामुळे हा वाद झाला. त्यानंतर ही हाणामारी झाली आहे. याप्रकरणी बोईसर (ता.जि.पालघर) आगाराचे वाहक विजय भगीरथ बनसोडे (मुळ रा.जळगाव) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात मारहाण व शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अबुबकर मुजीब शेख (३० रा. हरी मंजील सोसा. हजरत हॉल, पाण्याच्या टाकीजवळ, द्वारका) व अय्याज हैदर अली शाह (३२ रा.महालक्ष्मी चाळ समोर, बागवानपुरा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. बनसोडे रविवारी (दि.२३) जळगाव बोईसर या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली.
द्वारका भागात दोघांनी बस आडवित चालकास व वाहकास शिवीगाळ केली. यावेळी पत्नीला स्टॉप मागेच का उतरविले असा जाब विचारत संतप्त दोघा संशयितांनी बनसोडे यांना दमदाटी करीत मारहाण केली. पोलिसांनी तात्काळ दोघा संशयितांना अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक डी.वाय.पवार करीत आहेत.