नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शालिमार भागात दोन वर्षांची हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावरणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद अझरूद्दीन इकबाल शेख (३२ रा.नाईकवाडीपुरा, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. मोहम्मद शेख याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिस त्याच्या मागावर असतांनाच तो शुक्रवारी (दि.२१) सायंकाळच्या सुमारास शालिमार भागात मिळून आला. याप्रकरणी पोलिस कर्मचारी धनंजय हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कोळी करीत आहेत.
२७ वर्षीय युवकाची आत्महत्या
२७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शरणपूररोड भागात घडली. ऋषिकेश प्रकाश सोनवणे (रा.फ्लॅट नं.२,हेरंब सोसा.) असे मृत युवकाचे नाव आहे. सोनवणे याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनवणे याने शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास मफलर बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत विशाल बलखंडे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.