नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगाघाटावरील रामसेतू पुलाखाली दरोडा टाकण्यासाठी दबा धरून बसलेल्या टोळीस पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीच्या ताब्यातून धारदारशस्त्रांसह दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून, पोलिसांची चाहूल लागताच संशयितांचा एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित उर्फ लाल्या दिपक भालेराव (२३ रा.इंगळे कॉलनी, लामखेडे मळा, दिंडोरीरोड), गौरव कैलास गदावी (२२ रा.तुलसी विहार अपा. तारवालानगर, दिंडोरीरोड), राहूल विनोद वाघेला (२१ रा.अत्रीसुत कृपा, शिवाजीनगर, जेलरोड) व उदय सुनिल चारोस्कर (२१ रा. लक्ष्मणनगर, फुलेनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, विकी उर्फ काळ्या कोयत्या बाळू जाधव (रा. नवनाथनगर, पेठरोड) हा संशयित पोलिसांची चाहूल लागताच पसार झाला आहे.
पंचवटीचे गस्ती पथक शुक्रवारी (दि.२१) मध्यरात्री गोदाघाटावर गस्त घालत असतांना संशयित पोलिसांच्या हाती लागले. गंगाघाटावरील रामसेतू पुलाखाली पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी धाव घेतली असता टोळके पोलिसांच्या हाती लागले. तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा उचलत पसार होण्यात यशस्वी झाला असून या टोळक्याच्या ताब्यातून धारदारशस्त्रासह दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार करीत आहेत.