नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाट परिसरात गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे शहरातील तडिपारांचा वावर पुन्हा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक भिकन जगताप (२५ रा.कुमावतनगर) व प्रविण उर्फ बादल पवन वाघ (२३) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. संशयितांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यांच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.
शहर आणि जिह्यातून दोघांना तडिपार केलेले असतांना त्यांचा शहरातच वावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस दोघांच्या मागावर असतांनाच गुरूवारी (दि.२०) ते गोदाघाट परिसरात आले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांच्या मुसक्या आवळल्या.
जगताप हा खंडेराव महाराज पटांगणावरील एका चायनिज खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडीजवळ तर वाघ हा इंद्रकुंड भागात मिळून आला. या दोघांनी न्यायलय अथवा कुणाचीही परवानगी घेतलेली नव्हती. या प्रकरणी पोलिस शिपाई काळे व परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास जमादार काकड आणि नाईक गुंबाडे करीत आहेत.








