नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका परिसरात कट मारल्याच्या कारणातून दुचाकीस्वारांनी एसटी अडवून चालकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णू लिंबराज गायकवाड (रा.सलगरा ता.तुळजापूर जि.धाराशिव) यांनी तक्रार दाखल केली आहे. गायकावड एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत असून बुधवारी (दि.१९) ते तुळजापूर डेपोच्या बसवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली.
नाशिक-तुळजापूर या बसमध्ये ते प्रवासी भरून सायंकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासास लागले असता द्वारका परिसरातील सर्वोदय हॉस्पिटल समोर पाठीमागून एमएच १५ एच ७५८३ या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वाराने बस अडवून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी संशयिताने कट मारल्याच्या कारणातून कुरापत काढून बसच्या चालक कॅबीन मध्ये शिरून गायकवाड यांना मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.