नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवनरोड भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल दिलीप तुपसुंदर व त्याचे तीन साथीदार अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी फरमान बबन कुरेशी (१९ रा. कोठावदे पुठ्ठा कंपनी, तपोवनरोड) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. कुरेशी मंगळवारी (दि. १८) रात्री तपोवनरोडवरील बाबाजी मॉल भागात गेला असता ही घटना घडली. संशयितांनी त्यास गाठून जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.
जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा भावांना लोखंडी मुसळीने मारहाण
पेठरोडवरील फुलेनगर भागात जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघा भावांना लोखंडी मुसळीने मारहाण करण्यात आली. या घटनेत दोघे भाऊ जखमी झाले असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश राजू खिची (२१ रा. महाराणा प्रताप नगर, फुलेनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. खिची व त्यांचे बंधू बुधवारी (दि.१९) आपल्या घरासमोर उभे असतांना (एमएच १५ जेएफ २५४९) या दुचाकीवर आलेल्या दोघा अनोळखींनी त्यांच्याशी जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त दुचाकीवरील दोघांनी आपल्या ताब्यातील लोखंडी मुसळीने दोघा भावांना बेदम मारहाण केली. या घटनेत खिची बंधू जखमी झाले असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.