नाशिकरोडला भरधाव अॅटोरिक्षा पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड ते सामनगाव मार्गावर भरधाव अॅटोरिक्षा पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. अशोक फकिरा ढिकले (५६ रा.स्वराजनगर,चाडेगाव सामनगाव) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ढिकले मंगळवारी (दि.१८) रात्री नाशिकरोड येथून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. नाशिकरोड येथून सामनगावच्या दिशेने ते आपल्या रिक्षातून प्रवास करीत असतांना चाडेगाव भागात भरधाव रिक्षा पलटी झाली.
या अपघातात ढिकले गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना बुधवारी डॉ.तृप्ती हिवराळे यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ए.ए.शेख करीत आहेत.
४३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
आपल्या राहत्या घरात ४३ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना उंटवाडी परिसरातील तिडकेनगर भागात घडली. विशाल दिपक सोनवणे (४३ रा.प्राची अपार्टमेंट, तिडकेनगर) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सोनवणे यांनी बुधवारी (दि.१९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या कडीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत रोहन जगताप यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.