नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली गावातील सोमवार बाजारात खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत दोन भामट्या महिलांनी एका महिलेची सोनसाखळी लंपास केली. याप्रकरणी गीतादेवी पुरूषोत्तम राम (रा.केंद्रीय विद्यालयासमोर,शिवराजनगर वडनेर दुमाला) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस चोरट्या महिलांचा शोध घेत आहेत.
गीतादेवी या सोमवारी (दि.१७) देवळाली गावातील सोमवार बाजारात गेल्या होत्या. मज्जीद परिसरात त्या भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीची सोन्याची चैन हातोहात लांबविली. परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेत ही घटना कैद झाली असून दोन महिलांनी सोनसाखळी लांबविल्याचे समोर आले आहे. अघिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिपालीनगर भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मृनाली मनोज थोरात (३५ रा.शैलादी सोसा. विनयनगर गणपतीमंदिराजवळ,दिपाली नगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोरात या मंगळवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील गणपती मंदिरापाठीमागून त्या रस्त्याने पायी फेरफटका मारीत असतांना मोपेड दुचाकीवरील भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.