नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवर भाजीबाजार परिसरात वडापाव विक्रेत्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडापाव तळत असताना उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील रगम तेल अंगावर सांडले. यात ही महिला गंभीर भाजली. आणि अखेर या व्यावसायिक महिलेचा मृत्यू झाला आहे. शुभदा अशोक लोखंडे (४६ रा. सप्ततारा रो हाऊस बोरगड, म्हसरूळ) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडे यांचा म्हसरूळ गावातील भाजी मार्केट परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. २३ फेब्रुवारी रोजी त्या आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती. वडपाव तळत असतांना गॅसवर ठेवलेल्या उकळत्या तेलाच्या कढईला धक्का लागला. त्यामुळे कढईतील तेल त्यांच्या अंगावर सांडले.
या घटनेत त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तातडीने सिनर्जी हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ त्यांना मुंबईतील केईएम रूग्णालयात हलविण्यात आले होते. महिना भराच्या उपचारादरम्यान २८ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार रानडे करीत आहेत.
सारडा सर्कल भागात तडिपार गजाआड
सारडा सर्कल भागात गुन्हेगारी कारवांयामुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे.याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याकूब जुम्मा शहा (२८ रा.नानावली, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या तडिपार संशयिताचे नाव आहे.
शहा याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यास दोन वर्षासाठी शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच मंगळवारी (दि.१८) सायंकाळी तो सारडा सर्कल भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धाव घेत भद्रकाली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी अंमलदार सागर निकुंभ यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्या आहेत. अधिक तपास पोलिस नाईक शेळके करीत आहेत.
५३ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
औद्योगीक वसाहतीतील साई लिला हॉटेल भागात झाडास गळफास लावून घेत ५३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. जलपत व्यंकट रेड्डी (रा.आयटीआय कॉलनी,मानस संकुल सातपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रेड्डी यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेड्डी यांनी मंगळवारी (दि.१८) परिसरातील साई लिला हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळया जागेतील आंब्याच्या झाडास दोरी बांधून अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा कार्तिक रेड्डी यांने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.