नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर पोलिस ठाण्यात एकाच कुटूंबातील चार जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे. कंपनीतील गुंतवणुकीवर जास्तीच्या व्याजदराचे आमिष दाखवून तब्बल सव्वा नऊ लाखास गंडा घातल्याची तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल किरण पाटील, सुरेखा किरण पाटील, शितल राहूल पाटील व किरण पाटील (रा. सर्व जाधव संकुल, चुंचाळे शिवार) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी चेतन राजेंद्र गुंजाळ (रा.शिवाजीनगर मार्केट जवळ, सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार एकमेकांचे परिचीत आहेत. संशयितांनी सन.२०२० मध्ये गुंजाळ यांना गाठून निलकृष्णा इंडस्ट्रीज या फर्म मध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीसाठी गुंतवणुक केल्यास जास्तीचे व्याज मिळेल असे आमिष दाखविले होते. त्यानुसार गुंजाळ यांनी २८ जानेवारी रोजी नऊ लाख १५ हजार १५० रूपयांची कंपनीत गुंतवणुक केली होती.
नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही संशयितांनी मोबदल्यासह रोकड परत न केल्याने त्यांनी पैश्यांचा तगादा लावला असता संशयितांनी वेळ मारून नेली. कालांतराने पुन्हा पैश्यांची मागणी केली असता संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.