नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पाच लाखाचा ऐवज लंपास केला. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे व रोकडचा चोरुन नेली. याप्रकरणी पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घरफोडी टाकळीरोड भागात घडली. किरण सुरेश रामचंदाणी (रा. बंगला नं.ए ४, कैलास सोसा.) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रामचंदाणी कुटुंबिय १३ ते १८ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या टेरेसवरील दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातून रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे तसेच देवदेवतांच्या चांदीच्या मुर्त्या असा सुमारे २ लाख ४९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
दुसरी घरफोडी पंचवटी भागात झाली. या घरफोडीची तक्रार वैभव वसंत पाटील (रा.रेशीमबंध कार्यालयाजवळ,एसएसडीनगर शिवकृपानगर) यांनी दिली आहे. पाटील कुटुंबिय सोमवारी (दि.१७) कामानिमित्त घराबाहेर गेलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ३० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.