नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवार कारंजा येथील प्रसिध्द चांदीचा गणपती मंदिरातून चोरी करून सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी करणा-या परप्रांतीय चोरट्यास सरकारवाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. हा चोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सराफ बाजार पोलिस चौकीतील कर्मचा-यांच्या नजरेत आला. पण, या चोराने रात्रीच्या वेळी गोदापात्रात उडी घेतली. पण, पोलिस पथकाने त्यास हुडकून काढत त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निहाल उदयभान यादव (२१ मुळ रा. मध्यप्रदेश, हल्ली अमृत दुग्धालय सरदार चौक, पंचवटी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. रविवार कारंजा येथील प्रसिध्द चांदीचा गणपती येथे रविवारी (दि.१६) ही घटना घडली होती. मंदिरातील मुख्यदरवाजाची काच फोडून संशयित मुर्तीच्या दिशेने अंगावरील दागिणे चोरण्यासाठी जात असतांना आवाज ऐकून धाव घेतलेल्या नारायण नामदेव हाके या सुरक्षारक्षकाच्या डोक्यात त्याने लोखंडी रॉडमारून जखमी केले होते.
सुरक्षा रक्षक जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळताच संशयिताने गणपती मुर्तीवरील दोन चांदीचे हार काढून धुम ठोकली होती. मात्र गंगावाडीच्या दिशेने तो पळत सुटल्याने ही बाब सराफ बाजार पोलिस चौकीत बसलेले पोलिस कर्मचारी शामराव अहिरे व बालाजी गिरी यांच्या नजरेस पडली. कुठलीही माहिती नसतांना दोन्ही कर्मचा-यांनी विलंब न करता संशयिताचा पाठलाग केला. पोलिस पाठीमागे लागल्याचे लक्षात येताच संशयिताने गोदावरी नदी पात्रात उडी घेतली.
या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आल्याने सहाय्यक निरीक्षक यतीन पाटील,पोलिस नाईक नितीन थेटे, शिपाई नाजीम शेख, पवन पगारे, विश्वजीत राणे, संदिप सावळे व चालक रविंद्र पठारे आदींच्या गस्ती पथकाने गोदाघाट गाठून संशयिताला पाण्याबाहेर काढले. चौकशीत त्याने गणपती मंदिरात सुरक्षा रक्षकावर हल्ला करीत चोरी केल्याची कबुली दिली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.