नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव परिसरात उड्डाणपूलाखाली जुगार खेळण्यास भाग पाडणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. हे दोन्ही संशयित जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ मनोहर मातुरकर (४४ रा. एसटी कॉलनी, बंगाली बाबा पळसे) व संजय देवराम पवार (४१ रा. गौतमनगर, शिंदेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. शिंदेगाव परिसरातील नायगावकडे जाणा-या उड्डाणपूलाखाली जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळय़ात अडकलेत.
दोघे उड्डाणपूलाखाली स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार ७०० रूपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पोलिस नाईक सचिन गावले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
लॅपटॉपसह चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला
सिडकोतील त्रिमुर्तीचौक भागात उघड्या खिडकीत हात घालून चोरट्यांनी लॅपटॉपसह चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. याप्रकरणी ऋषीराज भाऊसाहेब गायकवाड (रा.ऋषिकेश अपा. शंभूराजे नगर, त्रिमुर्तीचौक) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायकवाड यांचा सुमारे ३० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाईल गेल्या शुक्रवारी (दि.१४) बेडरूममधील टेबलावर ठेवलेला असतांना ही घटना घडली. गायकवाड कुटूंबिय आपआपल्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकीत हात घालून लॅपटॉपसह चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.