नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगरटाकळी येथील समतानगर भागात किराणा दुकानातून बेकायदा दारू विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत सुमारे ९०० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दुकानमालकासह अन्य एका विरोधी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकेश बबन हाटकर (२२ रा.मरीमाता मंदिराजवळ,समतानगर) व संदिप रामू पवार (२५ रा.रामदास स्वामी रोड,समतानगर) अशी दारू विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. संदिप पवार नामक संशयिताच्या मालकिच्या सप्तशृंगी किराणा दुकानात दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१७) पोलिस पथकाने धाव घेत दुकानात छापा टाकला असता संशयिताच्या ताब्यात सुमारे ९१० रूपये किमतीच्या देशी दारूचा साठा मिळून आला.
संशयित दुकानदारास त्याच्या दुस-या संशयित असलेल्या साथीदाराने माल पुरविल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलिस शिपाई आनंद घुमरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.