नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसांनी दोन कारवाईमध्ये कोयता व लोखंडी सुरा ताब्यात घेऊन दोघांना गजाआड केले आहे. पहिल्या घटनेत लहवित येथील पंचशिल नगरमधील सभागृह भागात गुरूवारी रात्री एक तरूण धारदारशस्त्राचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी धाव घेत अनिल भरत जाधव (२७ रा. पंचशिलनगर, लहवित) या संशयितास ताब्यात घेतले असून त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला आहे.
परिसरात आपला दबदबा कायम राहवा यासाठी तो कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजवित होता. संशयितास बेड्या ठोकत पोलिसांनी कोयता हस्तगत केला असून याप्रकरणी हवालदार गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.
दुसरा संशयित वर्दळीच्या जुने सिबीएस सिग्नल चौफुलीवर पोलिसांच्या हाती लागला. दर्शन उर्फ सोनू किशोर कंकाळ (२२ रा.भोसला मिलीटरी स्कूल मागे संत कबीरनगर झोपडपट्टी) हा युवक शुक्रवारी (दि.१४) सिबीएस चौकात धारदार सु-यांचा धाक दाखवत दहशत माजवित होता. सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी विश्वजीत राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक थेटे करीत आहेत.