नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन मोटार सायकल चोरट्यांकडून ६ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ६ महागडया मोटार सायकल नाशिकरोड पोलिसांनी जप्त केल्या आहे. यात हिरो होंडा कंपनीची १, बजाज कंपनीच्या ३, एक बुलेट, एक यामाहा अशा ६ महागड्या मोटार सायकलींचा समावेश आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेलरोड, राजराजेश्वरी, नाशिकरोड या ठिकाणाहून दुचाकी वाहन चोरी बाबत तक्रार आली होती. नाशिकरोड पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शोध पथक करत होते. या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला दोन संशयित व्यक्ती गुन्ह्यातील चोरीची मोटार सायकल घेऊन एकलहरा रोडवरील भाजीपाला मार्केट परिसरात फिरत असून, त्यांनी नाशिक शहरातून विविध ठिकाणाहून देखील दुचाकी चोरल्या असल्याची गुप्त माहिती मिळाली.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाने एकलहरारोड परिसर आणि भाजीपाला मार्केट परिसरामध्ये सापळा लावून संशयित आरोपी आयुष रविकांत भुसे, गणेश शाम भोसले या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता हिरो होंडा कंपनीची १ बजाज कंपनीच्या ३, १ बुलेट, यामाहा १ अशा एकूण ६ लाख २५ हजार रुपये किमतीच्या ६ महागड्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहे. या सर्व कारवाईची माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ चंद्रकांत खांडवी यांनी दिली.