नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या भागात राहणा-या तिघांनी शुक्रवारी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. यात एका नागपूर येथील युवकाचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव, नाशिकरोड आणि सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना नाशिकरोड भागात घडली. अश्विन चंद्रकांत नानवटकर (२१ रा.त्रिमुर्तीनगर, भंडारारोड, नागपूर) हा युवक शहरात दाखल झाला होता. गणेश मार्केट भागातील कैलास लॉजमध्ये तो थांबला असता ही घटना घडली. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून त्याने लॉजमधील रूम नं.०४ मध्ये छताच्या कडीला स्कार्प बांधून गळफास लावून घेतला. त्यात त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ उलटूनही तो रूमबाहेर न पडल्याने लॉज कर्मचा-यांनी पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. कोंडाजी उदावंत यानी दिलेल्या खबरीवरून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
दुसरी घटना सातपूर येथे घडली. वैजनाथ उत्तमराव शिंदे (३८ रा.धम्मचौक, स्वारबाबानगर) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी पत्र्याच्या शेडमधील बल्लीस साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ ज्ञानेश्वर शिंदे यांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. राहूल पाटील यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
तिसरी घटना जत्रा हॉटेल भागात घडली. येथे राहणा-या संजना गोरख वाकळे (१७ रा.शाम व्हिला अपा.) या युवतीने शुक्रवारी आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच तिला तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता डॉ. ओमकार गवळी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.