नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ वादातून शुक्रवारी वेगवेगळया भागात राहणा-या महिलांच्या घरात शिरून विनयभंग केल्याच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनामधील पीडिता व संशयित एकमेकांचे शेजारी आहे. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना टाकळीगावातील आदिवासी पाडा भागात घडली. अनिल भोये (३५) या संशयिताने शेजारी राहणा-या पीडितेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून हे कृत्य केले. महिलेच्या घरात कुणी नसल्याची संधी साधत संशयिताने मागिल भांडणाची कुरापत काढून पीडितेचा विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.
दुसरी घटना भराडवाडीत घडली. येथे राहणा-या राहूल शिंदे नामक संशयिताने शुक्रवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेजारी राहणा-या महिलेच्या घरात शिरून कुणी नसल्याची संधी साधत तिचा विनयभंग केला. यावेळी महिलेने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने शिवीगाळ करीत तुम्हाला बघून घेईन असा दम भरत काढता पाय घेतला. या घटनेने भेदरलेल्या महिलेने पोलिसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.