नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील उत्तमनगर भागात भरधाव पिकअपने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील मायलेक जखमी झाले आहे. शशिकांत श्रीराम अवसरकर (४० रा.विजयनगर,सिडको) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात स्वप्नाली अवसरकर (३८) व स्वरूप अवसरकर (९) हे मायलेक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवसरकर कुटुंबिय शुक्रवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अंबड लिंकरोडने अवसरकर कुटुंबिय बुरकुले हॉलच्या दिशेने जात असतांना बँक ऑफ इंडिया समोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ एचएच ६३४१ या मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीस धडक दिली.
या अपघातात अवसरकर यांच्या पत्नी व मुलगा जखमी झाल्याने नागरीकांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता गंभीर अवस्थेतील अवसरकर यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी रोहित चांडोले (रा.कामटवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पिकअप चालक हर्षल राजेंद्र गोरे (रा.बुरकुले हॉल मागे,सिडको) याच्याविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.