गप्पा गोष्टीसाठी घरी आलेल्या मुलीच्या मैत्रीणीने आईचे मंगळसूत्र चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिक नगर भागात गप्पा गोष्टी करण्यासाठी घरी आलेल्या मुलीच्या मैत्रीणीने महिलेचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तरूणीस ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेघा शेट्टी (१९ रा.अशोकनगर) असे संशयित तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी भारती पाटील (रा.कडेपठार चौक, श्रमिकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित तरूणी पाटील यांच्या मुलीची मैत्रीण असून ती गेल्या २४ फेब्रुवारी रोजी आपल्या मैत्रीणीस भेटण्यासाठी महिलेच्या घरी आली होती.
दोन्ही मैत्रीणी गप्पा गोष्टी करीत असतांना कुटुंबियांचे लक्ष नसल्याची संधी साधत तिने उघड्या कपाटातील सुमारे २६ हजार ५०० रूपयांचे मंगळसूत्र हातोहात लांबविले होते. ही बाब संशयित तरूणी घरी निघून गेल्यानंतर निदर्शनास आली होती. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास
नाशिकरोड येथील आनंदनगर भागात पती समवेत रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी शोभा भाऊसाहेब सोनवणे (रा.इंद्रप्रस्थ रो हाऊस,आनंदनगर) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनवणे या बुधवारी (दि.१२) आपल्या पती समवेत परिसरात फेरफटका मारीत असतांना ही घटना घडली. घराजवळील कदम लॉन्स समोरून सोनवणे दांम्पत्य पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून काही अंतरावर उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून पळ काढला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सागर डगळे करीत आहेत.