नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोकरीचे आमिष दाखवत कागदपत्राच्या आधारे महिलेच्या बँक खात्यावरील ८३ हजाराची रोकड परस्पर भामटयांनी लंपास केली.
इंटरनेटवर नोकरी शोधतांना ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूररोडवरील नरसिंहनगर भागात राहणा-या ललिता चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चौधरी या इंटरनेटच्या माध्यमातून पुणे शहरातील नामांकित दवाखान्यामधील नोकरीचा शोध घेत असतांना ही घटना घडली. गेल्या आठवड्यात भामट्यांनी चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी गॅलेक्सी केअर हॉस्पिटल मध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्यांनी वैयक्तीक माहिती ऑनलाईन भरून घेतली.
या माहितीच्या आधारे भामट्यांनी हा गंडा घातला असून चौधरी यांच्या एचडीएफसी बँकेच्या खात्यातील सुमारे ८३ हजाराची रक्कम परस्पर गुगल पे व्दारे काढून घेतले. अधिक तपास डॉ. सिताराम कोल्हे करीत आहेत.